सेवा


पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणेकामी सहाय्यकारी दल म्हणुन काम करणे हे होमगार्ड संघंटनेचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, शांतता व सुव्यवस्थाकामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्याव्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्य या दलाला पार पाडावी लागतात व त्याबाबतची तरतूद मुंबई होमगार्ड नियमामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानुसार अग्निशमन, विमोचन, पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळया प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना कार्यरत केली जाते. आपतकालीन अथवा संपकालीन परिस्थितीमध्ये समाजस्वास्थ्यासाठी जीवनावश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवणे याबाबत होमगार्ड संघटनेला जबाबदारी उचलावी लागते.

सतत प्रशिक्षणाधीन असणारे असे हे दल आहे. प्रशिक्षणामुळे हे दल सतत तयारीच्या अवस्थेत व कार्यक्षमतेने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम अशा अवस्थेत असते. बृहन्मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातुन जिल्हा प्रशिक्षण केंद्रे स्थापण्यात आलेली आहेत. ह्या प्रशिक्षण केंद्रातुन जिल्हा स्तरावरील प्राथमिक व उजळणी अशा दोन स्वरुपाचे प्रशिक्षण दिले जाते. बृहन्मुंबईतील होमगार्डसना प्रशिक्षण देण्याचे काम बृहन्मुंबईतील परिमंडळे पार पाडतात. जिल्हा स्तरावरील प्रशिक्षण केंद्रातील पुर्ण झाल्यानंतर राज्यस्तरावरील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेमध्ये नेतृत्व प्रशिक्षण, होमगार्ड संघटनेच्या कार्यकारणासाठी संबंधित असणाऱ्या निरनिराळ्या कलांच्या संबंधातील प्रगत प्रशिक्षण व तसेच नागरी संरक्षण संदर्भात होगार्डसना केंद्रक या स्वरुपात जे कर्तव्य पार पाडावे लागतात त्यासंबंधीचे प्रशिक्षण अशा निरनिराळ्या प्रकारचे प्रशिक्षणे या संस्थेत दिली जातात.

महाराष्ट्रात यापुर्वी अतीवृष्टीमुळे काही जिल्ह्यात तसेच मुंबई उपनगरात पुरसदृश परिस्थितीमध्ये २५३० होमगार्डसनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. तसेच गणपती बंदोबस्त २०१६ मध्ये २४६४३, नवरात्र उत्सव बंदोबस्त २०१६ मध्ये ९३०१४ होमगार्डसनी मदत केली. त्याचप्रमाणे बंदोबस्तासाठी सणांच्या तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी होमगार्डसनी सर्वतोपरी मदत केलेली आहे.

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी “कर्तव्यार्थ रेल संरक्षण पथक” म्हणुन रेल्वे पोलीसांना सहाय्य करण्यासाठी होमगार्ड सध्या कर्तव्यावर तैनात करण्यात आले होते. राज्यातील खाजगी संस्था, महामंडळे, कारागृहांना व शासकिय/निमशासकिय कार्यालयांच्या मागणीप्रमाणे प्रसंगानुरुप मदतीसाठी व बंदोबस्तासाठी होमगार्ड कर्तव्यावर दिले जातात.