इतिहास


नागरिकांचे जिवीतांचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. आधुनिक काळामध्ये कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत राज्य शासनाची कर्तव्ये व त्यांची कार्यक्षमता यामध्ये सतत वाढ होत असतानांही शासनाच्या मूलभुत कर्तव्यात फरक झालेला नाही. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी शासन आपले अधिकार काही अधिकृत विभागांना प्रदान करीत असते. परंतु हया जबाबदारीची व्याप्ती एवढी मोठी आहे की, हे कर्तव्य आपल्या निरनिराळया विभागांमार्फत पार पाडीत असतांना शासन नागरिकांकडूनही त्यांची समाजाबाबतची असणाऱ्या जबाबदारीची जाणीव ठेवून शासनाला शासनाचे हे महत्वाचे कर्तव्य पार पाडतांना हातभार लावावा, अशी अपेक्षा ठेवते. समाजातील घटकांकडून हया अपेक्षांची पूर्ती होण्यासाठी होमगार्ड संघटना ही सेवाभावी आणि मानसेवी संस्था शासनाने निर्माण केली आहे. समाजातील विविध स्तरातील व्यक्ती ज्यामध्ये पुरषांबरोबर महिलासुध्दा या दलामध्ये दाखल होवून त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या व व्यवसायाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन त्यांची सेवा समाजस्वास्थ्यासाठी उपलब्ध करुन द्यावी या उद्देशाने विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेतात व जरुरीच्या प्रसंगी कर्तव्यावर हजर होऊन आपली सामाजिक प्रतिष्ठा विसरुन होमगार्ड या नात्याने कर्तव्य पार पाडत असतात. समाजाच्या स्वास्थ्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी नागरीकांना करणे आवश्यक आहे त्या त्या करण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेवून जरुरीप्रमाणे कर्तव्यावर हजर होऊन कर्तव्य पार पाडणारी अशी होमगार्ड या संस्थेची व्याख्या आहे

होमगार्ड संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी महासमादेशक हे पद शासनाने निर्माण केले आहे. होमगार्ड संघटनेच्या नियंत्रणासाठी व त्या दलाच्या एकूण कार्यकारणासाठी महासमादेशक शासनाला जबाबदार आहेत. जिल्हा स्तरावर होमगार्ड संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी समादेशक हे जिल्हा स्तरावरील मानसेवी पद निर्माण केलेले आहे. जिल्हयातील या दलाच्या कार्यकारणासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. तर कार्यकारी विभागात निरनिराळया प्रकारची मानसेवी पदे आहेत. तालुका स्तरावर पण होमगार्ड संघटनेची तालुका पथके कार्यरत आहेत. एकूण ३६९ तालुका पथके सध्या कार्यरत असून तालुका स्तराखाली मोठया गावातून एकूण ३४ उपपथके कार्यरत आहेत. होमगार्डसची लक्ष्यसंख्या ठरविण्याचा अधिकार केंद्र शासनाने स्वत:कडे ठेवलेला आहे. कारण होमगार्ड संघटनेवर जो काही खर्च राज्य शासन करते त्याच्या २५% इतका खर्च केंद्र शासन सोसते. राज्यासाठीचे होमगार्ड संघटना उभारणीचे लक्ष्य आतापर्यंत ५३८०० इतके आहे. होमगार्ड संघटनेचे नागरी संरक्षण दृष्टीकोनातुन फार महत्व आहे

मानसेवी तत्वाच्या पायावर उभारलेल्या या संघटनेचा आदर्श केंद्रशासनाने देशामधील इतर राज्यांपुढे ठेवला व सन १९५९ मध्ये केंद्रशासनाने तशा प्रकारची शिफारस इतर राज्यांना केली. या मानसेवी संघटनेचे वैशिष्ट्य असे की, कार्यालयीन कर्मचारीवृंद वगळता कार्यकारी विभागातील सर्व पदे हि मानसेवी आहेत. या निरनिराळ्या पदावर समाजातील निरनिराळ्या स्तरातील व्यक्ती नेमल्या जातात. जिल्हा समादेशक नेमणूकीसाठी शासनाने मुंबई होमगार्ड नियम-१९५३ मध्ये दुरुस्ती करुन जुन २००८ मध्ये या पदासाठी काही किमान पात्रतेच्या अटी विहित करुन दिलेल्या आहेत. व त्यानुसार आता जिल्हास्तरावरील या नेमणुका केल्या जातात.

होमगार्ड आधुनिकीकरणा अंतर्गत सन २००३ पासुन होमगार्ड संघटनेस केंद्रशासनाकडुन प्राप्त निधीमधुन होमगार्ड प्रशिक्षण व्यवस्थित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र, अमरावती, धुळे, कोल्हापूर, नागपूर, उस्मानाबाद, रायगड, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, चंद्रपूर, रत्नागिरी, नांदेड, पुणे, परभणी, यवतमाळ, जळगाव, सांगली व औरंगाबाद यांचे बांधकाम पुर्ण झालेले आहेत, तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, घाटकोपर, औरंगाबाद, नागपूर येथे विविध उपयोगी सभागृह बांधण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद सिंधुदूर्ग व सातारा यांचे बांधकाम सुरु करण्यात आलेले असून उर्वरीत जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम पुर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्रामधुन होमगार्डसना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यायोगे होमगार्डसच्या कार्यक्षमतेचा स्तर उंचावण्यास मदत होत आहे

होमगार्ड आधुनिकीकरणा अंतर्गत सन २००३ पासुन जिल्हा समादेशक कार्यालयांना/जिल्हा प्रशिक्षण केंद्रांना मल्टीमिडीया प्रोजेक्ट्र, पेपर प्रेजेंटर, डीव्हीडी प्लेअर, कलर टीव्ही, व्हीडीओ कॅमेरा, डिजीटल कॅमेरा, संगणक प्रिंटर, इमरजन्सी लाईट असे विविध साहित्य/उपकरणे पुरविण्यात आलेली आहे. सदर साहित्य/उपकरणांच्या साहाय्याने होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणांमध्ये होमगार्डसना प्रगत करणे व प्रशिक्षणाचा स्तर उंचावणेकामी मदत होत आहे. सदर साहित्य/उपकरणांच्या साहाय्याने कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता व दळणवळणाची सोय झाली आहे. त्याच आधारे होमगार्ड भरती प्रभावीपणे होत असून लक्षसंख्येचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होत आहे.

होमगार्ड अधिनियम १९४७
सुधारीत दिनांक १३ नोव्हेंबर २००६
होमगार्ड नियम १९५३
१९६० पर्यंत सुधारित